उन्हाळय़ात विजेचे नो टेन्शन! कोयनेत मुबलक पाणीसाठा, दररोज 1500 मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यात यंदा विजेचे टेन्शन असणार नाही. तापमानाचा पारा चढू लागल्याने विजेची मागणीही वाढू लागली आहे. मात्र कोयना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढल्यास कोयना जलविद्युत प्रकल्पातून दररोज तब्बल 1500 मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती करता येणार आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

महावितरणकडे सध्या सरासरी 17-18 हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली जात आहे. तसेच तापमानाचा पारा जसा वाढेल तशी राज्याची विजेची मागणी पुढील दोन महिन्यांत वाढून सुमारे 21 हजार मेगावॅटपर्यंत वाढणार असून मुंबईच्या मागणीतही वाढ होणार आहे. महावितरण सध्याची आपली मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून सुमारे सहा-सात हजार मेगावॅट वीज घेत असून खासगी प्रकल्प आणि एनटीपीसीकडून प्रत्येकी पाच-सहा हजार मेगावॅट वीज घेत आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने कोयनेच्या पाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सध्या धरणात 74 टीएमसी पाणी शिल्लक असून त्यापैकी 24 टीएमसी पाण्याच्या माध्यमातून मे अखेरपर्यंत विजेची मागणी जास्त असताना दररोज तब्बल 1500 मेगावॅट वीजनिर्मिती करता येणार आहे. त्यामुळे एप्रिल आणि मेमध्ये ऐन उन्हाळ्यात पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.

1 जूनपासून नवीन जल कोटा मिळणार
कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी असून त्यापैकी सध्या धरणात 74 टीमएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यापैकी 24 टीएमसी पाणी मेअखेरपर्यंत वीजनिर्मितीसाठी वापरता येणार आहे. तर 1 जूनपासून नवे जलवर्ष सुरू होत असल्याने जरी पावसाला विलंब झाला तरी धरणातील अतिरिक्त पाणी वीजनिर्मितीसाठी वापरता येणार आहे.