
जीवघेण्या कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव झाला आहे. मुंबईतील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. मुंबईत आढळलेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुबईला फिरायला गेलेल्या पुण्याच्या दाम्पत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मंगळवारी त्या दाम्पत्याच्या मुलीला, सहप्रवाशाला आणि त्यांना मुंबईहून पुण्याला सोडायला गेलेल्या ओला चालकालाही कोरोना झाल्याचे उघड झाले. बुधवारी आणखी दोन सहप्रवाशांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याचे खळबळ उडाली आहे. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Public Health Department of Maharashtra: 2 more patients admitted at a Mumbai Hospital have tested positive for #Coronavirus. There are 7 positive cases in the state now.
— ANI (@ANI) March 11, 2020
महाराष्ट्रातील आकडा 7 वर
दुबईहून आलेले पुण्यातील दाम्पत्य, त्यांची मुलगी, सहप्रवाशी आणि ओला चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये आता आणखी दोन सहप्रवाशांची भर पडल्याने महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर पोहोचली आहे. कोरोनाचा झपाट्याने होणारा हा संसर्ग लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत.
मुंबईतील दोघांना संसर्ग
दुबईतून प्रवास करुन आलेले पुण्यातील 2 प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या सहप्रवाशांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रुग्णांसोबतचे मुंबईतील 2 सहप्रवासी देखील कोरोनाबाधित असल्याचा निर्वाळा कस्तूरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 7 झाली आहे.
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री
राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सामूहिक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे. शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेतानाच खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबिण्याची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी. जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.





























































