
राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाची पावले उचलत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी या रोगाचे संक्रमण झालेल्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण तलाव 30मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: All schools in Pune and Pimpri-Chinchwad will be closed till further notice except for class 10th and 12th examination. https://t.co/peSkYbpHOx
— ANI (@ANI) March 13, 2020
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जनतेने अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पुणे आणि पिंपरीमधील शाळा 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेतलेले हे निर्णय शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहतील. मात्र, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार केला जात असल्याचेही ते म्हणाले. ही साथ रोखण्यासाठी आगामी 15 दिवस महत्त्वाचे आहेत, त्यामुळे शाळा बंद करण्याबाबत परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्टच केले. कोरोनाच्या फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, जनतेत भीती पसरू नये, यासाठी आवश्यक सेवा वगळून गर्दीची ठिकाणे 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जनतेने घाबरून जाऊ नये, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचे संक्रमण झालेल्या देशांची यादी केंद्र सरकारने दिली आहे, त्यात अमेरिका आणि दुबईचा समावेश नव्हता. मात्र, आपल्याकडे आढळलेले कोरोनाचे रुग्ण या देशातून आले आहेत. त्यामुळे आपण केंद्र सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहोत. कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर व्यवस्था करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. आपण दक्षता घेतली तर पुढील धोका टाळू शकतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण तलाव 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून मध्यरात्रीपासून या आदेशाची अमलबजावणी होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
























































