
कोरोना व्हायरसची साथ आटोक्यात येईपर्यंत आपल्याला भेटायला राळेगणसिद्धीमध्ये कोणीही येऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, या व्हायरसच्या साथीला धैर्याने तोंड द्यावे. साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहनही हजारे यांनी केले आहे.
राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी देशातील विविध महाराष्ट्रासह इतर राज्यातून व परदेशातून पर्यटक येतात. सध्या जगभर कोरोनाची साथ पसरली आहे. देशात आणि राज्यातही कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामुळे ही साथ आटोक्यात येईपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये पर्यटकांनी येऊ नये, असा निर्णय राळेगणसिद्धी परिवाराने घेतला असल्याचे या पत्रकात नमूद केले आहे. आतापर्यंत 16 लाखांपेक्षा जास्त राज्य, देश व विदेशातील पर्यटकांनी राळेगणसिद्धीस भेट दिली आहे. विशेषतः अण्णा हजारे यांच्यासोबत फोटो काढून घेण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, गाव, परिसर, राज्य व देशातील लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांनी कोरोनाची साथ आटोक्यात येईपर्यंत राळेगणसिद्धीला येऊ नये, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.































































