
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज 31 झाली. मुंबईत पाचवा रुग्ण सापडला असून पनवेल आणि कल्याणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘साथ रोग प्रतिबंध कायदा’ लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडय़ा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दहावी-बारावीसह विद्यापीठाच्या परीक्षा मात्र वेळापत्रकानुसारच होतील. ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालये मात्र सुरू राहतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परीक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी मात्र पालक आणि शाळांनी घ्यायची आहे, असे टोपे म्हणाले. एवढेच नव्हे तर शहरांमधील मॉल्सही (अन्नधान्य, भाजीपाला विभाग वगळून) बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
राज्यातील कोरोनाबाधित
पुणे – 15
मुंबई – 5
नवी मुंबई – 1
पनवेल – 1
कल्याण – 1
नगर – 1
नागपूर – 4
ठाणे – 1
यवतमाळ – 2
बुलढाण्यात एका ‘संशयिता’चा मृत्यू
सौदी अरेबिया येथून परतल्यानंतर कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या कोरोनाच्या 71 वर्षीय संशयित रुग्णाचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी दिली.
राष्ट्रीय आपत्ती जाहीर
कोरोनाच्या उद्रेकाला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे सर्व राज्यांतील सरकारे आता कोरोनाशी लढण्यासाठी एसडीआरएफ फंडातून मदत मिळवू शकतात असे सरकारने स्पष्ट केले आहे..
अमेरिका, स्पेनमध्ये आणीबाणी
कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. 11 वर्षांपूर्वी 2009 मध्ये स्वाइन फ्लूचे संकट निर्माण झाले होते तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आरोग्य आणीबाणी जाहीर केली. स्पेन सरकारनेही तब्बल 20 वर्षांनंतर आणीबाणी जाहीर केली आहे.



























































