कोरोनाच्या धास्तीने तुळजाभवानीच्या भाविक संख्येत घट, 8 एप्रिलच्या चैत्री यात्रेवर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कोरोना व्हायरसच्या भीतीने घट झाली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8 एप्रिलला होणाऱ्या चैत्री यात्रेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून हिंदुस्थानातही कोरोना व्हायरसच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. हिंदुस्तानात सर्वाधिक कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे नागरीकांतही भीतीचे वातावरण पाहायवास मिळत असून लोक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळा सुट्टी आणि चैत्री यात्रा या काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

तुळजाभवानीची प्रसिध्द असणारी चैत्री यात्रा 8 एप्रिल रोजी भरणार होती. या यात्रेनिमित्त हजारो भाविक देशातील विविध काना कोपऱयातून देवीच्या दर्शनासाठी येत असतात. पण जिल्ह्यात सध्या साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला असून सार्वजनिक सण, उत्सव, यात्रा शासनाच्या वतीने रद्द करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभुमीवर तुळजाभवानी देवीच्या आगामी चैत्री यात्रेवर अनिश्चितेचे सावट आहे. भाविक सध्या दर्शनास येत नसल्यामुळे मुख्य बाजारपेठेतील व्यवसाय कोलमडला आहे. संपूर्ण अर्थकारण पुजारी व्यवसायावर असल्यामुळे व्यापारी, पुजारी आणि यात्रेवर अवलंबून असणारे उद्योग अडचणीत आले आहेत.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोरोना भीतीने यात्रा कमी झाली आहे, सर्वच तीर्थक्षेत्रात अशी परिस्थिती असून तुळजाभवानीची चैत्री यात्रा होईल की नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही लहान व्यापारी मात्र यात्रा कमी झाल्यामुळे अडचणीत येणार आहोत.
– अभिजित अशोक निकम, पेढय़ाचे व्यापारी.

आज पहाटेपासून दुपारी चार वाजेपर्यंत केवळ दहा हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. सर्वसाधारणपणे 70 टक्के भाविकांची संख्या घटलेली आहे, कोरोनाचा फटका व्यापारी वर्गाला बसला आहे.
– श्रीनाथ शिंदे, प्रतिनिधी, व्यापारी मंडळ, तुळजापूर.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तुळजाभवानी देवीच्या चैत्री यात्रेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांची 18 मार्च रोजी अध्यक्ष डॉ. दीपा मुधोळ – मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यानंतर मंदिर संस्थांची अधिकृत भूमिका जाहीर होईल.
– नागेश शितोळे, तुळजाभवानी मंदिर जनसंपर्क अधिकारी.