मालवणातील पर्यटन ठप्प, आलेले पर्यटक माघारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मालवणच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पर्यटन बंद असल्यामुळे मालवणात आलेल्या पर्यटकांना मंगळवारी (17) माघारी परतावे लागले. नेहमी गजबजलेली मालवणची बंदर जेटी पर्यटकांच्या अभावी सुनीसुनी झाली आहे.

किल्ले सिंधुदुर्गसह मालवणातील सर्व जलक्रीडा व्यवसाय, किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बंद केले आहेत. हॉटेल व रिसॉर्ट व्यवसायावरही परिणाम झाला आहे. अनेक बुकिंग रद्द झाले आहेत. मालवणी जेवणासाठी प्रसिद्ध असलेली हॉटेल खानावळ या ठिकाणीही गर्दी नसल्याचेच चित्र आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रभाव असला तरी मालवणसह सिंधुदुर्ग कोरोनापासून दूर आहे. तरीही प्रशासन खबरदारी घेत बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक तपासणी करूनच मालवणात प्रवेश देत आहे. आता तर पर्यटनच पुढील आदेशपर्यंत बंद राहणार असल्याने त्याचा मोठा फटका व्यवसायिकांना बसणार आहे.

मालवणात पर्यटन बंद करण्यात आले, मात्र त्याची माहिती काही पर्यटकांना नसल्याने अनेक पर्यटक मंगळवारी मालवणात दाखल झाले. मात्र किल्ले दर्शनसह सर्वच पर्यटन व्यवसाय बंद असल्याने केवळ जेटीवरून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन करत काही वेळ किनाऱ्यावर घालवून पर्यटक माघारी परतले आहेत. यावर्षी पर्यटन हंगामाच्या सुरवातीला समुद्रातील दोन वादळामुळे पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले होते. त्यात सावरून पर्यटन बहरत असताना कोरोना साथरोगाने पर्यटनाला ब्रेक लावला आहे. लाखो रुपये गुंतवणूक असलेला व हजारो रोजगार असलेला पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने व्यवसाईक चिंतातुर बनले आहेत. मालवणच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून येत आहे.