#Corona बीड जिल्ह्यातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

बीड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने सर्व खासगी व शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गजन्य आजार (कोविड-19)ची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांनी आरोग्य यंत्रणांना दिले. क्लिनिक वगळता अंतर रुग्ण बेड क्षमता असलेल्या सर्व रूग्णालयात यासाठी कार्यवाही करण्याची तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी तातडीने कार्यवाही करावी असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत सुकटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर बी पवार यासह  विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रेखावार यांनी कोरोना संसर्गापासून जिल्ह्याला वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या. उपाययोजनांचा सर्वंकष आढावा घेतला

राज्यातील इतर शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्षमतेने कार्यवाही करताना आपल्या स्वतःचा, आपल्या सहकाऱ्यांचा परिवाराचा या संसर्गजन्य साथी पासून बचाव करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी. यासाठी जिल्हास्तरावर वरून विविध प्रकारचे आदेश आणि सूचना देण्यात येत आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जावी अशी स्पष्ट सूचना रेखावार यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले तालुका आरोग्य अधिकारी हे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण करतील व समन्वय साधतील तसेच वैद्यकीय अधीक्षक हे शहरी भागातील आरोग्य यंत्रणा यांच्यात समन्वय साधतील. याच बरोबर गट विकास अधिकारी नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांनीदेखील कोरोना नियंत्रणासाठी दिलेल्या आदेशांची संबंधित समाज घटकांकडून काटेकोर पालन होते आहे का याची काळजीपूर्वक तपासणी करावी. यामध्ये गर्दी व जमाव होऊ नये या अनुषंगाने आठवडे बाजार धार्मिक कार्यक्रम सप्ताह लग्न समारंभ जास्त लोकांच्या गर्दीमध्ये होऊ नयेत. सिनेमागृह, नाट्यग्रह, क्रीडा संकुल, व्यायाम शाळा या सोबत खासगी क्लासेस बंद केले जावेत.  त्या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी यासाठी तपासणी करून त्याचे अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावेत.

शासनाने नागरिकांचा सुरक्षेच्यादृष्टीने शाळा, महाविद्यालय, मंदिर, चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच उद्योग अस्थापना द्वारे वर्क फ्रॉम होम घरातून काम करण्याची सवलत दिली आहे. याचा अर्थ तुम्ही घरातच थांबावे असा आहे. चौकामध्ये रस्त्यांवर कार्यालयासमोर कोणत्याही प्रकारची गर्दी केली जाऊ नये असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शासन सूचनांनुसार व आदेशानुसार केलेल्या उपाययोजनांमध्ये अंमलबजावणी झाली नाही तर दोशी संबंधितांवर गुन्हे नोंद केले जातील असा कडक इशारा जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिला.