
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यामुळे त्याच दिवशी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुका आता 24 मार्च रोजी होणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी मध्यरात्री याबद्दल माहिती दिली.
गोव्यात उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या निवडणूकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्याचे कळताच भाजपसह निवडणूक लढवत असलेल्या सगळ्याच पक्षांना धक्का बसला.22 मार्च रोजी मतदान असल्याने जनता कर्फ्यू पाळायचा असेल तर लोक मतदानासाठी बाहेर पडू शकणार नाहीत याची कल्पना आल्या नंतर निवडणुका पुढे ढकलण्या बाबत निर्णय घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या.
जिल्हा पंचायत निवडणूकांसाठी जाहिर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता.त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षाचे नेते प्रचारात मग्न होते.पंतप्रधानांनी केलेले आवाहन समजल्या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजी येथील आपल्या सरकारी निवासस्थानी राज्य निवडणूक आयुक्त आर.के.श्रीवास्तव,मुख्य सचिव परिमल राय यांच्या सोबत रात्री अकरा वाजता तातडीची बैठक घेतली.
बैठकी नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी झालेल्या निर्णयाची माहिती देताना 22 मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यामुळे त्यादिवशी होणारी निवडणूक दोन दिवस पुढे ढकलून 24 मार्च रोजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या 49 जागांसाठी 22 मार्च रोजी होणारी निवडणूक आता 24 मार्च रोजी होणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाला बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे इतर गोष्टी बदलून नव्याने अधिसूचना काढावी लागणार आहे.24 मार्च रोजी निवडणूक असून दुसऱ्या दिवशी मतमोजणी ठेवायची असेल तर त्यादिवशी म्हणजे 25 मार्च रोजी गुढीपाडवा असल्याने मतमोजणी 26 मार्च रोजी घेतली जाण्याची शक्यता आहे.त्याशिवाय प्रचार आज संपणार की आणखी काही दिवस प्रचार करता येणार हे निवडणूक आयोगाची अधिसूचना आल्या नंतर स्पष्ट होणार आहे.
कोरोनाच्या सावटामुळे निवडणुका आता न घेता पुढे ढकला, अशी मागणी जोर धरु लागली होती.गोवा फॉरवर्ड,गोवा सुरक्षा मंच यांनी तशी मागणी लावून धरली होती.निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करत न्यायालयात देखील धाव घेण्यात आली आहे.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असे आवाहन सरकार करत असताना मुख्यमंत्री बंद दाराआड गर्दीच्या प्रचार सभा घेत असल्याने त्यांच्यावर देखील जोरदार टीका केली जात आहे.
दरम्यान सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.शाळा, कॉलेज, सिनेमा गृह, सार्वजनिक जलतरण तलाव, पब्ज, मॉल, स्पा, डिस्को, सुपर मार्केट, आठवडा बाजार 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.बोर्डाच्या परीक्षांवेळी दोन विद्यार्थ्यां मध्ये एक मिटर अंतर ठेवले जाणार आहे.विमानतळ, मुरगाव पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची थर्मल गनने तपासणी केली जात आहे.गोवा मेडिकल कॉलेज मध्ये कोरोना रुग्णांसाठी 30 खाटांचा अद्ययावत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
कोरोनामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाचे 1 हजार कोटींच्या आसपास नुकसान होईल,अशी भीती पर्यटन व्यावसायिक संघटनेचे म्हणणे आहे.बहुतेक महत्वाची पर्यटन स्थळे ओस पडली आहेत.मंदिरे,चर्चिस लोकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोना बाबत असलेल्या शंकाचे निरसन करण्यासाठी सुरु केलेल्या 7948058218 चॅटबोट नंबरवर 10 हजारहुन अधिक लोकांनी संपर्क साधून कोरोना बद्दल माहिती जाणून घेतली आहे.



























































