
कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. रोज नवीन रुग्णांची संख्या, आणि मृतांचा आकडा वाढत आहे. हिंदुस्थानमध्येही मृतांचा आकडा 5 वर पोहोचला आहे. इटलीवरून हिंदुस्थानात आलेल्या एका 69 वर्षीय पर्यटकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. राजस्थानमधील जयपूर येथील रुग्णालयात एंड्री कार्ली या पर्यटकाने दम तोडला. याआधी पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एका कोरोना बधिताचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना बाधितांचा आकडा 190 पार पोहोचला आहे. शुक्रवारी इटली येथील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. राजस्थानच्या जयपूरमध्ये 69 वर्षांची इटालियन पर्यटकाला तपासणीत कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. या व्यक्तीच्या पत्नीच्या विनंतीवरून त्याच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
एंड्री कार्ली हा 29 फेब्रुवारी पासून जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात आयसोलेशन वार्डात होता. 2 मार्चला त्याला कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले होते. या व्यक्तीच्या पत्नीने इटालियन दुतावासाला केलेल्या विनंतीवरून तिला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याची तब्येत बिघडल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र आज शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

मोदींचे आवाहन
दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केले. कोरोनासारख्या महामारीला जनतेनेच हरवायचे आहे यासाठी घराबाहेर न पडता काळजी घ्या आणि सतर्क रहा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. रविवारी 22 मार्चला कोणीही सकाळी 7 ते रात्री 9 दरम्याज कोणीही घराबाहेर पडू नका, आणि जनता कर्फ्यु पाळा, असे आवाहन मोदींनी जनतेला केले. तसेच अन्यधान्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी ग्वाहीदेखील मोदींनी दिली.


























































