बुलढाण्यात चार कोरोना संशयित नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. पुणे, मुंबई येथून आलेल्या नागरिकांनादेखील विलग करण्यात येत आहे. हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीने 14 दिवस घरातील खोलीत निरीक्षणाखाली रहावे. बुलढाणा आयसोलेशान कक्षात दाखल 4 संशयित नागरिकांचे नागपूर येथील प्रयोगशाळेतून रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

घरातच निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये आज प्रथमच एकाही नागरिकाची भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही.  गुरूवारपर्यंत  विदेशातून आलेल्या 64 हिंदुस्थानी नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत विलग करून ठेवण्यात आले होते. तसेच आज शुक्रवारी एकही नवीन नागरिक निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेला नाही. मात्र घरीच 14 दिवसांचे निरीक्षण पूर्ण केलेल्या 3 नागरिकांची निरीक्षणातून सुटका करण्यात आली.  अशाप्रकारे तीन वगळता जिल्ह्यात एकूण 61 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात बुलढाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात चार नागरिकांना संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. जिल्हयात आतापर्यंत 84 विदेशी हिंदुस्थानी नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची यापूर्वीच निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलढाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 02 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.