उल्हासनगरच्या महापौर इन अॅक्शन; सॅनिटायझिंग स्प्रे मारण्यासाठी रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उल्हासनगर महानगरपालिकेने कोरोनावर पुर्णतः मात करण्यासाठी संपूर्ण शहरात सॅनिटायझिंग स्प्रे ची फवारणी मारण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी 180 पंप तैनात करण्यात आले असून आज महापौर लिलाबाई आशान यांनी रस्त्यावर उतरून सॅनिटायझिंग स्प्रे ची फवारणी केली आहे. यावेळी आमदार कुमार आयलानी, शिवसेना शहरप्रमुख तसेच पालिकेचे सभागृहनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरूण आशान,मुख्य स्वछता अधिकारी विनोद केणे,एकनाथ पवार हे देखील महापौर लिलाबाई आशान यांच्यासोबत उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भावावर मात किंबहूना नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पालिका मुख्यालयात ठाण मांडले आहे. त्यांच्यासोबत मुख्यालय तसेच आरोग्य उपायुक्त संतोष देहरकर,उपायुक्त मदन सोंडे,मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण, मुख्यलेखा परिक्षक मंगेश गावडे,सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, अजयकुमार एडके, तुषार सोनवणे,मुख्य स्वच्छता अधिकारी विनोद केणे, एकनाथ पवार यांच्या सोबत 300 कर्मचारी ऑनड्युटी तैनात आहेत. उल्हासनगरात विदेशातून आलेली एकमेव महिला ही कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. पण आता ही महिला व तिच्या संपर्कात आलेले सर्वजण फिट असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिल्याने शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

मात्र कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने पालिकेने संपूर्ण शहरात सॅनिटायझिंग स्प्रे ची फवारणी करण्यासाठी 5 ट्रॅक्टर,180 स्प्रे पंप,40 फॉगिंग मशीन सक्रिय केल्या आहेत. आम्ही तुमच्या आरोग्यासाठी रस्त्यावर आहोत.तुम्ही केवळ घरात थांबून पालिका प्रशासनाला सहकार्य करा.असे आवाहन महापौर लिलाबाई आशान, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी उल्हासनगरकरांना केले आहे.