पिंपरीतील आणखी 5 कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटीव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिंपरी-चिंचवडमधील आणखी 5 कोरोनाग्रस्तांचा पहिला चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. या रुग्णांच्या घशातील द्रावाची पहिली चाचणी घेण्यात आली होती. तिचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आता दुसरी चाचणी शनिवारी करण्यात येणार असून त्याचा अहवाल उद्या प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा अहवाल देखील निगेटीव्ह आल्यास रुग्ण नियम पूर्ण करून घरी परतू शकतात. या पाचही जणांवर गेले 14 दिवस महापालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. शुक्रवारी इथून 3 कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे होऊन घरी परतले होते.

महाराष्ट्राला आणखी एक दिलासा देणारी बाब ही आहे की कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय असणाऱ्या 17 जणांचे चाचणी अहवाल देखील निगेटीव्ह आले आहेत. यामुळे आता पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण पॉझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर लागोपाठ असे 12 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले होते. त्यापैकी पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले आणि ते घरी परतले. त्यापाठोपाठ आता आणखीन पाच रुग्णांचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. या रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने आज आणखीन एकदा तपासणीसाठी ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात येणार आहे. या तपासणीत देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हे रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ असल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.

दरम्यान, कोरोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 17 संशयितांचे रिपोर्ट देखील ‘निगेटीव्ह’ आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, कोरोना बाधित असलेल्या 8 जणांची प्रकृती स्थिर आहे. मागील आठ दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळला नाहीये आणि ही शहरवासीयांसाठी दिलासायदक बाब आहे.