
कोरोना विषाणू संसर्गाच्या संदर्भात लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने कडक पाऊल उचलून सुद्धा नागरिक घराच्या बाहेर पडत असल्याने आता नांदेड पोलिसांनी ड्रोन कॅमेराचा आधार घेवून त्याआधारे बाहेर पडणाऱ्या व्यक्तींच्या वाहनाविरुद्ध व व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणू संसर्गाच्या संदर्भात नांदेड शहरात चाळीस ठिकाणी बॅरीकेटींग लावून रस्त्यावरची वाहतूक थांबवली आहे. फक्त अत्यावश्यक वाहने, रुग्णवाहिका, यासाठीच रस्ता खुला करून दिला जात आहे. तीन दिवसापूर्वी ही यंत्रणा राबल्यानंतर सुद्धा गल्लीबोळातील छोट्या छोट्या रस्त्यांचा आधार घेवून शेकडो नागरिक चारचाकी वाहनाव्दारे बाहेर पडत आहेत. त्याचप्रमाणे सकाळी फिरायला जाणे, व्यायाम करणे, यासाठीही नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. ही बाब गंभीर असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आजपासून ड्रोन कॅमेराव्दारे नांदेड शहरातील नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. याबाबत बोलताना मगर म्हणाले की, सूचना देवून देखील नागरिक काळजी घेणार नसतील व बाहेर पडत असतील तर अशावेळी ड्रोन कॅमेराचा पर्याय उरतो. या माध्यमातून नांदेड शहरातील दहा किलोमीटरच्या परिसरात हा ड्रोन कॅमेरा फिरणार आहे. अवैधरित्या कुठलीही गरज नसताना दुचाकी, चारचाकीवर फिरणाऱ्या वाहनांची फोटो व त्याचे क्रमांक हा कॅमेरा टिपणार असून त्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करणे, दंड आकारणे आणि प्रत्यक्ष अटक करणे, हे चारच पर्याय आता उरले आहेत. याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरातील विमानतळ, नांदेड ग्रामीण, वजिराबाद, भाग्यनगर, शिवाजीनगर, इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा कॅमेरा फिरणार आहे. त्या माध्यमातून गुन्हे दाखल केले जातील, आता कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही मगर यांनी सांगितले.























































