
कोरोना विषाणू संक्रमणाबाबत‘हाय अलर्ट’वर असणार्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून उदगाव (ता. शिरोळ) येथे आलेल्या चौघांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. यामध्ये एका युवतीचा समावेश आहे.
उदगाव येथील काळम्मावाडी वसाहतीमध्ये ही युवती अन्य तिघांसह इस्लामपूरहून आली होती. मात्र, आरोग्य विभागाला न कळविता हे चौघेही तसेच राहिले होते. पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहिती कळताच त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेशन दुकानांसमोर रांगा
राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य देण्याचे आदेश दिल्यानंतर जयसिंगपूर शहरातील विविध स्वस्त धान्य दुकानांसमोर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्याच्या निर्णयामुळे स्वस्त धान्य दुकाने विहीत वेळेत उघडली जात आहेत. विशिष्ट शिधापत्रिका असणार्या नागरिकांना स्वस्त दरात तांदूळ, गहू आदि धान्ये देण्याच्या निर्णयामुळे नागरिक या दुकानांसमोर पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करीत या धान्यांचे वितरण केले जात आहे.
जास्त दराने विक्री..दुकानावर छापा
दरम्यान, काळम्मावाडी वसाहतीत खाद्यतेल, डाळी आदि वस्तूंची जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी एका किराणा दुकानावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. सहायक फौजदार विलास निकम व प्रभारी सरपंच आर. जी. वरेकर यांनी या दुकानावर छापा टाकला. गावात कोणीही चढ्या भावाने विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिरोळ, कुरुंदवाडमध्ये पुन्हा बंद
एक दिवसाच्या शिथिलतेनंतर शिरोळ शहरात पुन्हा कडकडीत बंदची सुरूवात झाली. किराणा, भाजीपाला, फळे, औषधे, दूध आदिंची दुकाने एक दिवस पूर्ण सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. आता पुन्हा तीन दिवस शिरोळ पूर्णतः बंद राहणार आहे. या बाबत नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आता 6 एप्रिलपर्यंत पुन्हा शिरोळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे मानधन आणि कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन कोरोना निधीला देण्याचे ठरले. बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी आदि उपस्थित होते. कुरुंदवाड येथेही पुन्हा तीन दिवस पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
























































