कोरोनाचा  मच्छीमारांना फटका, डिझेल परताव्याची साडेसहा कोटीची रक्कम  माघारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्यातील लाखो मच्छीमार याआधीच विविध नैसर्गिक अस्मानी संकटात सापडले असतानाच आता त्यामध्ये कोरोना महामारीच्या सुलतानी संकटाची भर पडली आहे. कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 2500 मच्छीमारांसाठी राज्य वित्त विभागाकडून डिझेल परताव्याची आलेली साडेसहा कोटीची रक्कम मार्च अखेरपर्यंत वाटपाविना माघारी गेली आहे. रायगड मत्स्यविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळेंच परताव्याची रक्कम परत गेल्याचा आरोप मच्छीमार संस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे  परताव्याची रक्कम राज्याच्या वित्त विभागाकडून पुन्हा मत्स्यविभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्याकडे  करण्यात आली आहे.

राज्यातील मुंबई,ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांचे डिझेल परतावे शासनाकडे थकीत आहेत. दोन वर्षांपासून शासनाकडे थकीत असलेल्या परताव्याच्या कोट्यावधींची रक्कम मच्छीमारांना अदा करण्याची मागणी सातत्याने विविध मच्छीमार संस्थांकडून केली जात आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमार संस्थांचाही समावेश होता. मच्छीमार संस्थांच्या मागणीला अनुसरून राज्याच्या वित्त विभागाने थकित असलेल्या 32 कोटींच्या डिझेल परताव्यापैकी 6 कोटी 49 लाखांचा निधी रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी पाठविला होता. मात्र रायगड मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे डिझेल परताव्याची साडेसहा कोटीची रक्कम वाटप न होताच माघारी गेली आहे. मत्स्यविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळेंच डिझेल परताव्याची रक्कम मच्छीमारांपर्यत पोहचली नसल्याचा आरोप करंजा- उरण येथील वैष्णवी माता मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी सहकारी संस्थेने केला आहे. परताव्याची रक्कम मिळाली नसल्याने मात्र मच्छीमारांवर  उपासमारीचे संकट कोसळले असल्याचा आरोपही संस्थेकडून करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात 2227 मच्छीमार बोटी आहेत. राज्यातील मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या एकूण थकित असलेल्या डिझेल परताव्याच्या रकमेपैकी 6 कोटी 49 लाख रुपयांचा निधी  रायगड जिल्ह्यासाठी पाठविण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या वित्त विभागाने अनुदानाच्या रक्कमच लॉक केले आहे.त्यामुळे बीडीएसची रक्कम काढता येत नाही. त्यामुळे निधीचा वापरही करता येऊ शकतं नसल्याची  माहिती रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त रत्नाकर राजम यांनी दिली.