आज केवळ घरातील दिवे बंद करा, इतर उपकरणे सुरू ठेवा – महापारेषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातील दिवे 9 मिनिटांसाठी बंद करून पणती, मेणबत्ती पेटविण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर महापारेषणने राज्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार सर्व वीजनिर्मिती केंद्र आणि वीज वितरण कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून रविवारी राज्य भार प्रेषण केंद्राकडून (sldc- kalwa) येणाऱ्या सूचनांची काटेकोर अंमलबाजवणी करावी असे बजावले आहे.

दिवे बंद केल्यानंतर राज्यात सुमारे 1700 मेगावॅट ने विजेची मागणी घटणार असल्याने त्याचवेळी काही औष्णिक वीज केंद्र झिरो शेड्युलवर चालवण्याचे निर्देश देण्याबाबतचे नियोजन केले आहे तर दिवे बंद चा कार्यक्रम संपल्यानंतर 9 मिनिटांनी पुन्हा विजेची मागणी वाढणार आहे….ती पूर्ण करण्यासाठी 1920 मेगावॅटचे कोयना आणि 450 मेगावॅट चे टाटा पॉवर चा जलविद्युत प्रकल्प सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान ग्राहकांनी घरातीलकेवळ दिवेच बंद करावेत अन्य कोणतीही उपकरणे बंद ठेवू नये असे आवाहन महापरेषण ने केले आहे.