परभणीच्या सेलू कॅम्प मधील संख्या 65 वर, सर्व अधिकारी दक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेलू येथील नूतन शिक्षण संस्थेच्या श्रीरामजी भांगडीया वसतिगृहात सध्या मध्यप्रदेश, कर्नाटक यासह इतर राज्यातील मजूरांना विलगीकरण कक्षात ठेवलेले आहेत. या सर्वांची व्यवस्था करणे आणि आणखी मजुरांनी स्थलांतर करू नये, तसेच शहरातही गर्दी होऊ नये यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य आणि नगर परिषद अहोरात्र परिश्रम घेत आहे.

श्रीरामजी भांगडीया वसतिगृहात आजपर्यंत एकूण 65 मजुरांना ठेवण्यात आले आहे. रविवारी रात्री 9 जण मंठा येथून कराड कडे पायी जातांना येथील रायगड कॉर्नरवर ताब्यात घेण्यात आले. हे सर्व जण पैठण येथील नाथशष्टी कार्यक्रम करून कराडकडे पायी निघाले होते. सर्वांना लगेच ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करून वसतीगृहात त्यांना पाठवण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा 22 जण आपापल्या गावाकडे जाण्याच्या बेतात असतांना प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून या वसतिगृहात रवानगी करण्यात आली.

शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष विनोद बोराडे सतत नियोजन करीत आहेत. नगर परिषदेचे कर्मचारी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी चेक पोस्ट तयार केल्या असून त्या ठिकाणी विविध अधिकारी कर्मचारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सेलू तालुक्यात अजून कोरोनाचा एकही रुग्ण पोसिटीव्ह नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.