भुकेने मरायचं भ्याव वाटतं या! म्हणणाऱ्या भुकेल्या मजुरांना सामाजिक संस्थांचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर देशभरातील कष्टकऱ्यांची आणि हातावर पोट असलेल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. प्रसासन, सामाजिक संस्था, सुजाण नागरीक त्यांना जिथे मदत पोहचवता येईल तशी पोहचवत आहेत. नगर जिल्ह्यातील स्नेहांपूर या संस्थेला केडगाव मधील भट्टीवर आणि बांधकामात बिगारी काम करणाऱ्या 5 मजूर कुटुंबांच्या दयनीय अवस्थेबाबत कळाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब तिथे धाव घेतली आणि या मजूर कुटुंबाना मदत केली. यावेळी बोलताना काही मजुरांनी ‘आम्हाला कोरोनापूर्वी भुकेने मरायचं भ्याव वाटतं या, 2 दिवसांपासून खायला काहीच नाही’ अशा शब्दात त्यांची व्यथा मांडली. या मजुरांनी रोजंदारीच्या पैशातून कसेबसे 12 दिवस काढले. परंतु मागील 3 दिवसांपासून त्यांच्याजवळ खायला काहीच उरले नव्हते. घरात मुले भुकेने व्याकूळ झालेली होती. या मजुरांच्या कुटुंबांना स्नेहांकूरच्या वतीने किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. लॉकडाऊन कालावधी संपल्यावर या कामगार कुटुंबांना त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्याची आणि तोपर्यंत जगविण्याची जबाबदारीही स्नेहांकुर संस्थेने घेतली आहे.