
नगर जिल्ह्यातील 26 करोनाबाधितांपैकी 21 जण दिल्लीच्या मरकजशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. नगर जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून शब्ब ए बारातच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिल सायंकाळी 6 ते 10 एप्रिल सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या 12 तासांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत किराणा दुकाने, दुध, दुग्धोत्पादने, फळे, भाजीपाला, मेडिकल्स दुकाने आदी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शब्ब ए बारात सण घरात राहूनच साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपासून शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत किराणा दुकाने, दुध, फळे, भाजीपाला, मेडिकल्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत. त्यामुळे 12 तासांसाठी शहर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.



























































