
जायकवाडी येथील जुन्या पाणी पुरवठा योजनेचे रोहित्रामध्ये बिघाड झाली असून, महापालिकेने खर्च दिला तरच या रोहित्राची दुरुस्ती करू, असे पत्र वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याने आयुक्तांना दिले आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात सर्वत्र काळजी घेतली जात असताना, महावितरण कंपनीने घेतलेली भूमिका योग्य नाही, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी सांगितले.
महापालिका व महावितरण कंपनीमध्ये वीज बिलांवरून नेहमीच वाद होतो. यावेळी मात्र रोहित्राच्या बिलावरून वाद उफाळून आला आहे. जायकवाडी येथील जुन्या पाणी पुरवठा योजनेसाठी वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रामध्ये काही दिवसांपूर्वी बिघाड झाला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची दुरुस्ती महावितरण कंपनीतर्फे केली जाते. त्यानुसार यावेळी देखील महापालिकेने वीज वितरण कंपनीला दुरुस्तीसंदर्भात कळविले. मात्र यावेळी कंपनीने दुरुस्तीसाठी नकार दिला. महापालिका दुरुस्तीसाठी लागणारे आठ ते दहा लाख रुपये भरण्यास तयार असेल तरच दुरुस्ती केली जाईल, असे पत्र कार्यकारी अभियंत्याने आयुक्तांना पाठविले असल्याचे महापौरांनी नमूद केले. सह व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली असून, चव्हाण यांनी सकारात्मकता दर्शवीत रोहित्राची दुरुस्ती करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका काम करत असताना, महावितरण कंपनीने घेतलेली भूमिका चुकीची आहे, असे महापौरांनी नमूद केले.
केली तात्पुरती व्यवस्था
खर्चाची मागणी करत कंपनीने रोहित्र ऐवजी थेट पोलवरून वीज पुरवठा महापालिकेला जोडून दिला आहे. त्यामुळे ही तात्पुरती सोय धोकादायक असून, शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, असे महापौरांनी सांगितले.

































































