
सोलापूर मध्ये आतापर्यंत 212 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून बाकीचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
दक्षिण सोलापुरातील वांगी परिसरातून काम करणारा मजूर ग्वाल्हेर येथे गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. यानंतर या परिसरातील सर्व गावांची काल आणि आज पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. जवळपास 3 हजार60 लोकांची तपासणी झाली. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. काल जवळपास 56 जणांची या भागात कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ते 46 जणांचे अहवाल उद्या सकाळपर्यंत प्राप्त होतील अशी माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
दिल्लीतील मरकज येथील कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या आणि त्यांच्याशी संबंधित 53 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे अहवाल पूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. यातील 22 जणांची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली होती. त्यांचेही अहवालही निगेटिव्ह आले आहेत अशी माहितीही शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापूर शहर पोलिसांनी शहरातील विविध भागातील गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू सेवांचा लाभ घेताना आणखी काटेकोर नियमावली केली आहे. सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजीपाला विक्री, 2 वाजेपर्यंत घरपोच भाजी सेवा देता येईल. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत तसेच दुपारी 4 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दूध विक्री करता येईल. किराणा दुकान व बेकरी माल यांना सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेतच विक्री करता येईल. त्यानंतर घरपोच सेवा देण्यास मुभा असेल.
बँक सेवा सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेतच सुरु ठेवता येईल. कीटकनाशक बी-बियाणे खते यांची दुकानं सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेतच सुरू राहतील.






























































