फ्रीजमध्ये चिकन, घरात महिन्याभराचे रेशन; तरीही उपाशी असल्याची चाँद मोहम्मदची थाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीने अनेक गोरगरिबांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासन त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचवत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही काही जण जाणूनबुजून यंत्रणेची दिशाभूल करून गैरफायदा घेत असल्याच्या घटना घडत आहेत. राजस्थानमध्येही अशीच एक घटना उघड झाली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाऊन दरम्यान अजमेर येथील जिल्हा प्रशासनाकडे एक फोन आला. समोरच्या व्यक्तिने आपण भुकेने तडफडत असल्याचं सांगितलं आणि मदत मागितली. प्रशासनाने त्या व्यक्तिचा पत्ता विचारला आणि खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं. जेव्हा कर्मचारी या व्यक्तिच्या घरात पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

या व्यक्तिचं नाव चाँद मोहम्मद असं असून त्याच्या घरात महिनाभर पुरेल इतकं किराणा सामान सापडलं. इतकंच नव्हे तर फ्रीजमध्ये चिकनही सापडलं. प्रशासनाला भुकेने तडफडत असल्याचा फोन करणाऱ्या चाँदच्या घरात मोटार सायकल, गॅस, फ्रीज, कुलर इत्यादी वस्तू होत्या. त्यामुळे अर्थातच त्याने मुद्दाम त्रास देण्यासाठी हा फोन केला हे उघड झालं. प्रशासन गरजूंना आवश्यक सेवा पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. तरीही काही जण जाणूनबुजून असे अडथळे आणत आहेत, असं मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.