लॉकडाऊनमध्ये घरी परतण्यावरून राडा, सूरतमध्ये मजुरांनी केली जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये कामांसाठी गेलेले मजूर त्याच राज्यात अडकून पडले आहेत. गुजरात येथे अशाच प्रकारे अडकून पडलेल्या मजुरांनी गोंधळ माजवत जाळपोळ केल्याची घटना घडली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात येथील सूरत या शहरातही हजारो मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी यातील अनेक मजूर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी घरी परत जाण्यासाठी गोंधळ माजवायला सुरुवात केली. स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी त्यांना रोखायचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या मजुरांनी तेथील अनेक गाड्या आणि ठेल्यांना आग लावली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. तेव्हा हे मजूर शांत झाले.

सूरतमधल्या या मजुरांनी सुरुवातीला लॉकडाऊनचं पालन केलं आणि तिथेच राहिले. मात्र, आता त्यांचा आरोप आहे की, त्यांना पगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे रोजच्या जेवणासाठी लागणारा किराणाही भरून ठेवता येत नाही. त्यामुळे ते परत घरी जाण्यासाठी उत्सुक आहेत.