
बदलापूरात कोरोना हातपाय पसरत असून बदलापूरात शनिवारी तीन रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने हे परिसर सील केले आहेत. बदलापूर पूर्व भागात दोन तर पश्चिम भागात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये पूर्व भागातल्या एका 45 वर्षांच्या महिलेसह तिच्या 20 वर्षांच्या मुलीला तर पश्चिम भागात एका 28 वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.
बदलापूर पूर्वेकडील ही महिला व तिची मुलगी नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी साताऱ्याला गेले होते. तर बदलापूर पश्चिम भागातील तरुण मुंबईतील खाजगी रुग्णालयात कामाला आहे. रुग्णालय बंद असल्याने तो बदलापूरला आला होता, अशी माहीती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली. या सर्वांना पाच दिवसांपूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल मिळाला आहे. त्यानुसार या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला आहे. सध्या बदलापुरात 13 जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या तिन्ही रुग्णांना सिव्हिल कोव्हीड स्पेशल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच या भागांमध्ये नगरपरिषदेमार्फत सर्व्हे सुरु करण्यात आला असून इतर नागरिकांचीही माहिती घेतली जात आहे.
नगराध्यक्षांनी केली पाहणी
कोरोना रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या वतीने बदलापूर पूर्व व पश्चिमेकडील दोन्ही भाग सील करण्यात आले आहेत. या कामाची नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी पाहणी केली. त्याचबरोबर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कै. दुबे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांच्याशीही चर्चा केली.































































