
पिंपरी -चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या आणि पुण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात नोकरीला असलेल्या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. या नर्सचे कोरोना रिपोर्ट आज (शनिवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. तर, शुक्रवारी शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 झाली आहे. तर, आजपर्यंत 29 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात राहणारी नर्स पुण्यातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती. चार दिवसांपुर्वी त्रास होऊ लागल्याने ती शहरातील घरी आली होती. या नर्सच्या घशातील द्रावाचे नमुने तपासले असता तिचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, तिच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील तिघांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहेत.
10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 29 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 14 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, तीन सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


























































