
कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू असतानाही तोंडाला मास्क न लावता विनाकारण गावात फिरताना आढळून आलेल्या जामखेडज तालुक्यातील चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जामखेड तालुक्यातील नान्नज येथील तीन आणि खर्डा येथील एकावर संचारबंदीचे उल्लंघन आणि मास्कशिवाय फिरत असल्याने जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांटा आढावा घेण्यासाठी जामखेड पोलिसांचे एक पथक तालुक्यातील नान्नज परिसराच्या गस्तीवर होते. नान्नज गावात पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकाल काही व्यक्ती मास्कशिवाय गावात विनाकारण फिरताना आढळले. पोलीसांनी त्यांना हटकले असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विनाकारण आणि मास्कशिवाय घराबाहेर पडण्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल शिवाजी भोस यांच्या फिर्यादीवरून जामखेड तालुक्यातील नान्नज येथील विष्णू किसन मोहळकर, दत्तात्रय नारायण काटे, बंडु बबन गाजरे या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर खर्डा येथे पोलिस कॉन्स्टेबल मनोज साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश भागवत होडशिळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस विनाकारण, मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. लॉकडाऊन काळात लागू असलेल्या कायद्याचे कोणी उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी दिला आहे.
























































