दीड हजार नागरिकांना मदत; उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा अन्नदानाचा महायज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संक़मण रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या मदतीसाठी संभाजीनगरमध्ये शिवसेनेने अन्नछत्र सुरु केले आहे. शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या अन्नदानाच्या महायज्ञात दररोज दीड हजार नागरिकांना जेवणाची पाकिटे दिले जात असून धान्यांचीही मदत केली जात आहे. या मदत यज्ञाचा गाजावाजा किंवा प्रसिद्धी न करता मदतयज्ञ अखंडपणे सूरु आहे.

कोरोना व्हायरसचा धोका वाढल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन जाहिर केला. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबावर संकट कोसळले. रोजगार बुडाला, हाताला काम नाही, घराबाहेर पडायचे नाही, अशा परिस्थितीत पोट कसे भरणार असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा गोरगरीबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी झोपणार नाही यासाठी 23 मार्चपासून गारखेडयातील आपल्या निवासस्थानी मदत केंद्र सुरु केले. युवा सेनेच्या कार्यकर्त्याच्या मदतीने व बजाज कंपनीतील कामगारांच्या सहकार्याने शहराच्या कानाकोपऱ्यातील बेघर, मजूर, गरजू व्यक्तींची माहिती घेवून यादी तयार केली. गरजूंना अन्नाचे पाकिटे देण्याची योजना आखली. स्वतः जवळची सर्व रक्कम त्यात टाकली. साहित्य खरेदी केले, सहा आचारी, दहा महिला कामासाठी लावल्या. पोळी, भाजी, खिचडी असे पाकिट तयार करून गरीबांपर्यंत पाकिटे पोहचविण्याचे काम सूरु आहे. दररोज दीड क्विंटल गव्हाच्या पोळ्या, तीस ते पस्तीस किलो भाजी, पंचवीस किलोची खिचडी तयार करून वाटप केले जात आहे. यासोबत पाण्याची बाटलीही देण्यात येते. कर्तव्य बजावणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी, वसतीगृहातील मुली, कामगार, मजूर, बेघर, तांड्यावाड्यावरील गरीब रहिवासी, विटभट्टीवरील मजूर यांनाही पाकिटे दिली जात आहे.

अन्नधान्यांचेही वाटप
अन्नांच्या पाकीटाबरोबरच धान्यांचे पाकिट दिले जात आहे. एका पाकिटात 10 किलो गहू, तीन किलो तांदूळ, तिखट, मसाला, मीठ पुडा, अर्धा लिटर तेल, डेटॉल साबण असे साहित्याचे पाकिट तयार केले जाते. हे पाकिट विजयनगर, बाळकृष्णनगर, भारतनगर, गुरुदत्तनगर, विजय चौक, कारगील मैदान, शिवाजीनगर, कबीरनगर भागातील गरजू कुटुंबाच्या घरासमोर सकाळी सहा वाजेच्या दरम्यान पाकिट ठेवून कार्यकर्ते परततात. आतापर्यत आठ क्विंटल गहू, तीन क्विंटल तांदूळ वाटप केले. मदतीचा सदैव हात देण्याचे काम सूरू असल्याचे पहायला मिळाले.

दानशूर व्यक्ती, सोसायटींची मदत

उपमहापौर जंजाळ यांनी सूरु केलेल्या मदत यज्ञाला वीस दिवस पूर्ण झाले. या मदतयज्ञाला दानशुर व्यक्तींची मदत होत आहे. त्याचबरोबर नाथप्रांगण, सारा राजनगर, कासलीवाल रानवारा या सोसायटीमधील रहिवासी, जसवंतसिंग, देवीलाल यादव, उद्योजक मानसिंग पवार यांच्याकडून रोख रक्कम व धान्य मिळाले आहे. आजपर्यत 23 हजार पाकिटे, 8 हजार पाण्याच्या बाटल्या, दीड हजार मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

सकाळी 11 वाजता वाटपाला सूरुवात
दररोज सकाळी सात वाजता स्वयंपाकाला सूरूवात होते. पोळी, भाजी आणि खिचडीचे पाकिट तयार करुन टूव्हिलर, फोर व्हिलर वाहनातून वाटपास युवा सेनेचे कार्यकर्ते सूरुवात करतात. हॅण्डग्लोज, मास्क लावून कार्यकर्ते वाहनाने संपूर्ण शहरातील कानाकोपऱ्यायात जाऊन अन्नाची पाकिटे देतात. सायंकाळी पाच वाजेपर्यत परत आल्यानंतर दुसऱ्या दिवसाचे नियोजन करतात. अन्नदानाच्या महायज्ञासाठी लागणारे धान्य शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहे. लॉकडाऊनमूळे शेतमाल विक्रीसाठी आणता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करुन त्यांनाही मदत होते व आपलीही गरज भागवली जात असल्याचे जंजाळ यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीचे आचरण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकरण करण्याची शिकवण दिली. या शिकवणीचे आचारण करीत गोरगरीबांची सेवा करीत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सेवा करीत असून या मदत यज्ञाला दानशूर व सोसायटीमधील नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यानी सांगितले.