
संभाजीनगरात कोरोनाचे रुग्ण आढळलेले शहरातील 11 भाग सील करण्यात आले आहेत. या सील केलेल्या या भागांमधून आतापर्यंत 6223 घरांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी दिली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे, मेघा जोगदंड यांची उपस्थिती होती.
शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यामुळे आतापर्यंत 11 भाग सील करण्यात आले आहेत. या भागातील शंभर मीटरच्या परिघात असलेल्या प्रत्येक घराचे सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यत 6223 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून या घरांमधील 28,250 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. सर्वेक्षणासाठी 103 पथके काम करीत आहेत. विस्थापितांसाठी तयार करण्यात आलेल्या निवारागृहात 125 नागरिक आहेत. रात्र निवारागृहात 225 नागरिक आहेत. होम क्वारंटाइनची संख्या 192 आहे, तर कलाग्राम मधील क्वारंटाइन सेंटरमध्ये 35 जणांना ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, घरी रहावे,सुरक्षित रहावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.




























































