उरणमध्ये दोन इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण परिसरात सापडलेल्या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 17 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असुन तपासणी नंतर त्यापैकी 17 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान जेएनपीटी कामगार वसाहत आणि उरण शहरातील काही भाग सील करण्यात आला असून उपचारासाठी गेलेल्या कोटनाका येथील खासगी रुग्णालयाही सील करण्यात आले आहे. या खासगी रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जेएनपीटी कामगार वसाहतीमध्ये राहाणारी सीआयएसएफ जवानांची पत्नी आणि उरण कोटनाका येथील हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उरणच्या सभोवार असलेल्या मुंबई, नवी मुंबई, पनवेल आदी विभागांना कोरोनाची बाधा झाली आहे. जरा बाहेर पडलं तर आणि नियम पाळले नाहीत तर काय होतंय असं म्हणत बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या बेफिकीरपणामुळेच कोरोना महामारीचा शिरकाव आता उरणमध्येही झाला आहे.

जेएनपीटी वसाहत आणि कोटनाका- उरण येथील सापडलेल्या दोनही रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्रीचा शोध घेऊन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 17 पैकी 15 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दोन इसमांच्या रिपोर्टची प्रतिक्षा प्रशासनाला लागून राहिली आहे.या संशयित सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात आले आहे.