
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना सर्व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आले आहेत. अशा परस्थितीत पुण्यातील वाघोली येथे रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे काम करणारे सहा कुटुंबातील 33 जण एका टेम्पोला स्टीकर लावुन टेम्पोतून परभणी जिल्ह्यात जात असताना बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील गंगामसला चेकपोस्टवर सोमवारी सकाळी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी पकडले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करून प्रशासनाने सर्व नागरिकांना आहे त्याच ठिकाणी राहून घरात बसण्याचे आवाहन केले आहे. अशा परस्थितीत हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांचे मोठे हाल होत असून आपल्या गावाकडे जाण्यासाठी लोक अनेक क्लुप्त्या लढवून घर जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोंडगे पिंपरी (जी. परभणी) येथील सहा कुटुंब मागील 20 दिवसापासून पुणे येथील वाघोली येथे अडकून पडले होते. सर्वजण रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे काम करीत होते. गुत्तेदाराने लक्ष देत नसल्याने त्यांनी रविवारी रात्री रेशन धान्याची चिठ्ठी लिहिलेल्या एका टेम्पोतून लेकराबाळासह गावाकडे प्रवास सुरु केला.
पुणे, नगर जिल्ह्याच्या हद्दी चुकवीत सोमवारी ते बीड, परभणी जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या गंगामसला चेकपोस्टवर आले. पोलिसांना संशय आल्याने टेम्पोची तपासणी केली असतान आतमध्ये नागरीक असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील तिघांवर गुन्हा दाखल केला असून सर्व मजुरांची माउली लॉन्स येथील वीलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.
























































