सिंधुदुर्गात अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताच्या कामात गुंतलेल्या पोलीस यंत्रणेला चकवा देत अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांना पोलीस दलाने चांगलाच दणका दिला आहे. जिल्ह्याभरात केलेल्या करवाईत 17 लाख 75 हजार 436 रुपयांची अवैध दारू आणि हातभट्टीसाठी लागणारे 60 हजार रुपयांचे रसायन जप्त करण्यात आले आहे. तर दारू विक्री करणाऱ्या 126 व्यावसायिकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यामध्ये लॉकडाऊन आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संचारबंदी आहे. तरीही काहीजण दारुची अवैध वाहतूक आणि विक्री करत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना समजली. त्यानंतर गेडाम यांनी सर्व पोलीस ठाण्यांना याविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कणकवली, बांदा, दोडामार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करून एकूण 16 लाख 72 हजार 456 रुपये इतक्या रकमेची अवैध दारू जप्त करून कारवाई केली. तसेच जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांमध्ये दारू विकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून एक लाख दोन हजार 980 रुपयांची दारू जप्त केली आहे. त्याचप्रमाणे कणकवली पोलीस ठाणे हद्दीत हातभट्ट्यांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचे रसायन आणि अन्य साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुरक्षित राहावी यासाठी जिल्हा पोलीस दल व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत दारू विक्रेत्यांनी अवैद्य दारूचा व्यवसाय करू नये, यासाठी जिल्ह्यातील एकूण 126 व्यावसायिकांची कसून चौकशी जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अवैद्य दारू विक्री करताना आढळून आल्यास व सामाजिक आरोग्य धोक्यात आणल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली आहे.