
कोरोना संसर्ग हा घशातील द्रव्याशी संबंधित असून त्याचे स्वॅब कलेक्शन तपासण्याचे पहिले सेंटर केरळने तयार केले आहे. केरळच्याच धर्तीवर प्रथम नागपूर नंतर उल्हासनगर महानगरपालिकेनेही स्वॅब कलेक्शन सेंटर उभारले आहे. महाराष्ट्र राज्यातील हे दुसरेच सेंटर आहे. आरोग्य उपसंचालकांनी सेंटरची पाहणी केल्यावर महापौरांच्या उपस्थितीत या सेंटरचे उद्घाटन झाल्यावर ते कार्यान्वित करण्यात आले आहे.
एका बारीक यंत्राद्वारे घशात असणारे कफ,थुंकी आदी स्वॅब कलेक्शन करून त्याची तपासणी लॅबमध्ये केली जाते. त्यात कोरोनाची लक्षणे, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह याचे निदान करण्यात येते. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या पुढाकाराने उल्हासनगरातील नेहरू चौकात स्वॅब कलेक्शन सेंटर सज्ज झाले असून शनिवारी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपसंचालक गौरी राठोड यांनी या सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे. महापौर लिलाबाई आशान यांच्या उपस्थितीत स्वॅब कलेक्शन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, शिवसेना नगरसेवक अरुण आशान, पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर, डॉ. राजा रिझवानी उपस्थित होते.






























































