
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. या काळात रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. अनेक गावातून पाण्याच्या टॅंकरची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेची कार्यालयीन यंत्रणा कोरोनाप्रतिबंध लढ्यात गुंतली आहे. अशावेळी यंदाच्या वर्षी पाणीटंचाईसाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांची संयुक्त पहाणी रद्द करून कोरोनाच्या संकटात खासबाब म्हणून पाणीटंचाई ग्रस्त गावाना पाणीपुरवठा करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाई सुरु झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या पाणी टंचाई आराखड्यातील ज्या गावात पाणी योजना राबवली गेली व ज्या गावात पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. अशी गावे वगळून इतर गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरु करावा अशी विनंती रोहन बनेनी केली आहे
विद्यार्थांसाठी कृती अभ्यास
लॉकडाऊनच्या काळात जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थी सध्या घरीच आहेत. या विद्यार्थ्यांसाठी जिल्हापरिषदेने कृती अभ्यासक्रम ही अनोखी योजना राबवली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार केला असून इंटरनेटच्या सहाय्याने तो डाऊनलोड करून तो ऑफलाईनही पाहू शकतात अशी माहिती अध्यक्ष रोहन बने यांनी दिली. हा अभ्यासक्रम रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील विद्यार्थी त्याचा मोफत लाभ घेऊ शकतात.




























































