
राज्यात लॉकडाऊन असल्याने मद्यप्रेमींची अडचण झाली आहे. दारूची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे तळीरामांची गोची झाली असून अशा बिकट परिस्थितीतही अनेकजण कुठे काही मिळते का, याचा शोध घेत आहेत. असाच ऑनलाइन शोध एका तळीरामाला चांगलाच महागात पडला. त्याने दारूच्या एका बाटलीची ऑनलाइन ऑर्डर दिली खरी. पण दारूची बाटली घरपोच येणे तर सोडाच… थेट खात्यातून वीस हजार रुपये गायब झाल्याने या तळीरामाची झिंग उतरली आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या एका नागरिकाला दारू प्यायची तलफ आल्याने त्याने शोधाशोध सुरू केली. पण कुठेच काही मिळेना. अखेर त्याने वेगवेगळ्या वेबसाईटवरही शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण दारू काही मिळाली नाही. व्हॉट्सअॅपवर आलेला फॉरवर्ड मॅसेज त्याच्या मित्राने मोबाईलवर पाठवला होता. या मद्यप्रेमीने व्हॉट्सअॅपवर आलेल्या नंबरवर संपर्क केला. आधी त्यांना पेटीएमने पैसे भरण्यास सांगितले. त्यांनी पेटीएमवरून 560 रुपये भरले. आता आपल्याला ऑनलाइन दारूची बाटली घरपोच मिळेल याचा आनंद त्याला झाला होता. त्यानुसार त्याने फक्कड बेतही ठरवला होता.
थोड्याच वेळात त्याला परत त्याच नंबरवरून फोन आला आणि तुम्हाला पुढील प्रोसेससाठी व्हॉट्सअॅपवर बारकोड पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले. या बारकोडवर स्कॅन केल्यास तुमची पुढील प्रोसेस संपेल असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी बारकोडवर स्कॅन केले. लगेचच दुसऱ्या मिनिटाला त्याच्या खात्यातून 19 हजार 900 रुपये काढून घेण्यात आले. याविषयी विचारणा केली असता त्याला समोरून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर मद्यापायी डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ त्या व्यक्तीवर नागरिकावर आली.

























































