
>> विद्या गेजगे जावीर
केवळ कोणाची कन्या, बहीण, बायको, आई अशी स्त्रीची ओळख न राहता ‘आपले काम’ हीच ओळख झाली पाहिजे. अशी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आव्हान आजच्या स्त्रीपुढे आहे हे नक्की. स्त्री जेव्हा स्वमत मांडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिया मताला निरोगी मनाने दुजोरा दिला जात नाही, हे बदलायला हवं. अर्थार्जनासाठी स्त्री आज घराबाहेर पडते; पण करिअर करत असताना घरातील तिच्या जबाबदार्या मात्र अजूनही सुटत नाही. देवदेवता, महिला, बाई, कर्तृत्ववान, अशी लेबले न लावता फक्त एक ‘माणूस’ म्हणून स्त्रीला सन्मानाने जगता यावं हे फार मोठं आव्हान आहे.
वैदिक काळातील मैत्रेयी, गार्गी, इतिहासकाळातील जिजाऊ, चाँदबीबी, झाशीची राणी, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले ते राजकारणातील इंदिरा गांधींपासून ते अंतराळवीर कल्पना चावलापर्यंत इतिहास साक्षीदार आहे, की स्त्री आपल्या कार्याचा प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत आहे. हे सगळे संदर्भ, प्रेरणा घेऊनच आजच्या स्त्रीची बदलती मानसिकता आणि आव्हाने यांचा विचार करता अनेक दुवे समोर आले.
मुळात स्त्री जन्माला येत नाही, तर ती समाजाकडून घडवली जाते असेच विचारवंत स्त्रीवादी लेखिका ‘सिमोन द बोव्हर’ने म्हटले आहे. त्याचा पडताळा घेत असताना असे लक्षात येते की, समाज संस्कृतीच्या नावाखाली, परंपरेच्या नावाखाली स्त्रीला एका साच्यात बसवतो. मग फार पूर्वीपासून स्त्रीच्या कामाची, तिच्या गुणांची विभागणी केली गेली. घरातल्या मोठय़ा जबाबदार्या, अर्थार्जन, घरातील निर्णय हे सगळे पुरुषांकडे. अगदी धीटपणा, धाडस, निर्णयक्षमता अधिकार गाजविणे हे सगळं पुरुषांकडे आणि सौंदर्य, नाजूकपणा, हळवेपणा, चंचलता, घर सांभाळणे, मुलांवर संस्कार, शारीरिक दुबळेपणा, स्वयंपाक घर हे सगळं स्त्रीसाठी गणले गेले. आणि कोणतीही चिकित्सा न करता पूर्वीपासून स्त्री अशीच घडवली गेली.
पण सावित्रीआईने खूप मोठे शिक्षणाचं वरदान स्त्रीला बहाल केलं आणि शिक्षणामुळेच स्त्रीला खर्या अर्थाने मनुष्यत्व आलं. आज स्त्री अर्थार्जनासाठी बाहेर पडते. पण घर घरातील जबाबदार्या तिला अजूनही सुटत नाहीत. करीअर कर, पण आमच्या ताटात दोन गरम पोळ्या करून वाढ. मग तू करीअर करायला मोकळी. ही परिस्थिती अजून फारशी बदलली नाही. ही तारेवरची कसरत करत स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान आजच्या स्त्रीपुढे आहे. एखाद्या क्षेत्रातील करीयरसंदर्भात असलेले सेमिनार, कार्यशाळा, किंवा नोकरीतील उच्च श्रेणी स्व-होकारावर लगेच नाही स्वीकारता येत. अजूनही त्यासाठी घरच्याशी बोलणं, मतमतांतरे, निर्णय या सगळ्यांचा विचार करावा लागतो. घरची जबाबदारी, कर्तव्ये यांची तजवीज करून मग पुढील संधी स्वीकारावी लागते. ही सद्यस्थिती आहे. हे पेलण्याचे एक आव्हान आहे आजच्या स्त्रीपुढे. स्वतःच्या स्वप्नांच्या आड घरातील भूमिका, कर्तव्ये, नकार, निर्णय यायला नको. आपली स्वप्नं आपण सिद्ध करू मोकळेपणाने ही संकल्पना आताच्या घडीला तरी स्त्रीसाठी स्वप्नच राहिली आहे.
ज्येष्ठ समाजसेविका विद्या बाळ यांच्या child free संकल्पनेचा विचार करत असताना आज कितीतरी उच्च शिक्षित, उत्तम करीअर असणार्या स्त्रीला स्वतःचं मूल कधी, केव्हा जन्माला घालायचे किंवा नाही हा हक्क अजून तरी दिसत नाही. निदान असा निर्णय घेणे स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं.
केवळ कोणाची कन्या, बहीण, बायको, आई अशी स्त्रीची ओळख न राहता ‘आपले काम’ हीच ओळख झाली पाहिजे. अशी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आव्हान आजच्या स्त्रीपुढे आहे हे नक्की.
आज कामाच्या ठिकाणी, एक मुख्य अधिकारी या नात्याने जेव्हा ती कामासंदर्भात काही निर्णय, अधिकार आपल्याकडे घेते किंवा स्वमत मांडण्याचा प्रयत्न करते तेव्हा बर्याचदा तिच्या मतांना तितक्या निरोगी मनाने दुजोरा दिला जात नाही. मग अतिशहाणी, दीडशहाणी म्हणून मूल्यमापन केलं जातं. हे बदलायला हवं. तिच्या बाईपणाचा चष्मा आपण उतरवून फक्त एक माणूस म्हणून तिच्या मताचा आदर व्हायला हवा. आज प्रसारमाध्यमांतूनही स्त्री प्रतिमा खूप वेगळ्या पद्धतीने समाजापुढे मांडली जात आहे. ही खूप खेदाची बाब आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात भांडी घासण्याची किंवा स्वयंपाक घरातील अनेक कामांची जाहिरात करताना बाईच दाखवली जाते. म्हणजे स्त्री आणि स्वयंपाकघर हेच अतूट नातं आहे हे पुनः पुन्हा बिंबवलं जाते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, बर्याच चित्रपट, मालिका अशा माध्यमांतून स्त्री म्हणजे ‘उपभोग्य वस्तू’ असंच अधोरेखित केलं जातं आहे. अशा प्रतिमा समाजाने लाथाडायला हव्यात. यासंबंधीचा ‘युनेस्को’चा जागतिक स्तरावरचा अहवाल खूप धक्कादायक आहे. 75 वर्षांत तरी माध्यमांमधून स्त्री-पुरुष समानता येण्याची शक्यता नाही.
घर, करीअर, कुटुंब, नातीगोती समाजात एक कर्तृत्ववान महिला म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात स्त्रीने बरेचसे सकारात्मक यश मिळवले आहे. पण सद्यस्थितीत स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तूच आहे हे फार समोर येते आहे. मागील निर्भया, कोपर्डी, उन्नाव, कालचे हैदराबाद जळीत हत्याकांड, हिंगणघाट ऑसिड हल्ल्यापर्यंत. सिल्लोडच्या माय-लेकींची बलात्कार करून हत्या ही स्त्री अत्याचाराची मालिका आणि समोर येणारी आकडेवारी फार धक्कादायक आहे. यावर कायमस्वरूपी उपाय काढलाच पाहिजे. यासाठी सर्व स्तरांतून विचार होणं अत्यंत गरजेचे आहे. महिलांना आम्ही समान न्याय, समान संधी दिली, पण खर्या अर्थाने समाजव्यवस्थेत स्त्रीला सन्मानाची वागणूक अजूनही नाही. बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटना हेच सांगतात.
आज पुरुषी मानसिकता बदलणं खूप गरजेचे आहे, याची सुरुवात स्वतापासूनच व्हावी. स्त्रीविषयी रुढ घाणेरडय़ा विचारामुळे अगणित स्त्रियांची आयुष्ये बरबाद झाली आहेत आणि एकप्रकारची दहशत स्त्री मनात निर्माण होते आहे ही खूप गंभीर बाब आहे. यावर विचार व्हायला हवा. कुटुंबात, शालेय स्तरावर लिंगभेद विरहित शिक्षण देणे गरजेचे आहे. हा विषय तसा खूप मोठा आहे. जेंडर रोल्ससारखे सखोल विषय शालेय स्तरावरच राबविले पाहिजेत. लैंगिक शिक्षणाचाही समावेश व्हावा. तरच स्त्री आणि उपभोग्य वस्तू ही कोंडी फुटण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सोशल मीडियाचे युग आहे तेव्हा अशा समाजप्रबोधनाची जबाबदारी मोठय़ा प्रमाणात त्यांनी घ्यायला हवी. अशी अनेक आव्हाने आपल्यापुढे आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रीच्या प्रगतीवरून मोजली जाते. ते तितकेच खरे आहे. शेवटी देवदेवता, महिला, बाई, कर्तृत्ववान, अशी फक्त लेबले न लावता एक ‘माणूस’ म्हणून स्त्रीला सन्मानाने जगता यावं हे फार मोठं आव्हान आहे. ते तितक्याच ताकदीने, विचारक्रांतीने पेलता येवो हीच अपेक्षा.






























































