लॉकडाऊन 3 मेपर्यंत! पंतप्रधान मोदी यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरुद्ध लढाईत मर्यादित संसाधने असतानाही हिंदुस्थानने 21 दिवसांचा लॉकडाऊनचा मार्ग अवलंबिला. राज्य सरकारांनी चांगल्या पद्धतीने जबाबदारी हाताळली आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढविला आहे. राज्यांशी चर्चा केल्यानंतर देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येत आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्य, जिह्याचे बारकाईने निरीक्षण केले जाईल. कोरोनाचे हॉटस्पॉट वाढू देवू नका असे स्पष्ट करतानाच पंतप्रधानांनी लॉकडाऊन पुढील आठ दिवस आणखी कडक करणार असल्याचा इशारा दिला आहे. आज (दि. 15) 3 मेपर्यंतच्या लॉकडाऊनबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकार जारी करणार आहे. दरम्यान देशभरातील रेल्वे, विमान सेवा 3 मेपर्यंत बंदच राहणार आहे.

21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10 वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण केले. सर्व जनतेने अत्यंत मजबुतीने कोरोनाशी दोन हात केले आहेत. जनतेने त्रास सहन करून देशाला वाचविले. आपले कर्तव्य पार पाडले. आपल्या संविधानात आम्ही भारतीय लोक याचा उल्लेख आहे. राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. जनतेचा सामुहिक संकल्प हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली आहे असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली.

पंतप्रधान काय म्हणाले
– जेव्हा देशात कोरोनाचे 550 रुग्ण होते तेव्हा आपण 21 दिवसांचे लॉकडाऊन केले.
– कोरोनाचे संकट जागतिक आहे. त्यामुळे कोणत्याही देशाशी तुलना करणे योग्य नाही; पण वास्तव आपण नाकारू शकत नाही. जगातील अत्यंत ताकदवान देशांमधील आकडे पाहिले तर हिंदुस्थानातील परिस्थिती नियंत्रणात आहे हे दिसते. काही देशांमधील हजारो लोकांनी जीव गमावला आहे. आपल्याकडे लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला नसता तर हिंदुस्थानची स्थिती काय असती या कल्पनेनेच अंगावर शहारे येतात. त्यामुळे आपल्या देशाने निवडलेला लॉकडाऊनचा मार्गच योग्य आहे.
– लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवता आले. लॉकडाऊनची मोठी आर्थिक किंमतच चुकवावी लागली; पण देशवासियांच्या जीवासमोर ही किंमत काहीही नाही.
– राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.
– कोरोनाविरुद्धची लढाई यापुढे कशा पद्धतीने सुरू ठेवायची? कमीत कमी नुकसान होऊ द्यायचे. कोरोनावर विजय कसा मिळवायचा? याबाबत राज्यांबरोबर चर्चा सुरू आहे. लॉकडाऊन वाढवावा असे या चर्चेतून पुढे आले आहे. काही राज्यांनी आगोदरच लॉकडाऊन वाढविले आहे. आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन देशभरात वाढविण्यात येत आहे.
– लॉकडाऊन काळात शिस्तीचे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना पसरू देवू नये.
– देशात धान्यसाठा पुरेसा आहे. शेतकऱयांच्या अडचणी दूर केल्या जातील. देशात कोरोना रुग्णालयांचे स्थापना केली जात आहेत. लाखावर बेड उपलब्ध आहेत.

पंतप्रधानांनी वापरला गमचा
घरगुती बनविला सुती कपडय़ांचा मास्क, रूमाल वापरा असे आवाहन यापूर्वी पंतप्रधानांनी केले होते. आज राष्ट्राला उद्देशून भाषणावेळी पंतप्रधान मोदी यांनी गमचा वापरला.

सप्तपदी
1 . लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन
2. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या.
3. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गरम पाणी, काढे प्या.
4 आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करा.
5. गरिबांची काळजी घ्या.
6. कामगारांना नोकरीवरून काढू नये.
7. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टर, स्वच्छता दूत, पोलिसांचा सन्मान करा.