दीड लाख बेघर, कामगारांना सांभाळतेय पालिका, कोरोनाच्या प्रभावात माणुसकीचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नऊ लाख चपात्या, 31 हजार किलो भाजी आणि 90 हजार किलो खिचडी किंवा पुलाव देऊन मुंबई महानगरपालिका दररोज एक लाख 57 हजार बेघर आणि स्थलांतरित कामगारांचा सांभाळ करीत आहे. या उपक्रमात दररोज दोन वेळच्या जेवणासाठी 3 लाख 14  हजार अन्न पाकिटांचे मोफत वितरणही करण्यात येत आहे. ’कोरोना’च्या प्रभावात पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या ’माणुसकी’चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

‘कोरोना कोविड 19’ च्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या ’लॉकडाऊन’मुळे अनेक स्थलांतरित कामगार घरी जाऊ शकले नाहीत. तर बाजारपेठ, उपहारगृह बंद असल्यामुळे त्यांच्या रोजच्या जेवणाचीही सोय होणे कठीण आहे. त्यामुळेच मुंबईत अडकलेल्या या कामगारांच्या रोजच्या जेवणाची सोय बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. या उपक्रमात 1 लाख 57 हजारांपेक्षा अधिक स्थलांतरित कामगार आणि बेघरांच्या दिवसाच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी दररोज तब्बल 9 लाखांपेक्षा अधिक चपात्या, 31 हजार किलो भाजी किंवा 95 हजार किलो पुलाव/ खिचडी यांचे वितरण केले जात आहे. हे वितरण करण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि  लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेतले जात आहे.

असा राबवला जातोय उपक्रम

30 मार्च 2020 पासून बृहन्मुंबई महापालिकेमार्फत दोन वेळच्या जेवणासाठी मोफत अन्न पाकिटे देण्यास सुरुवात करण्यात आली. या प्रत्येक पाकिटामध्ये 3 चपात्या, 100 ग्रॅम भाजी इत्यादी देण्यात येत आहेत. तर काही वेळा सुमारे 350 ग्रॅम खिचडी किंवा पुलाव, अथवा राजमा चावल देण्यात येत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवडयात 14 हजार 500 गरजू व्यक्तींना दिली जात होती अन्नपदार्थांची पाकिटांची ही संख्या वाढून आता दररोज 1 लाख 57 हजार व्यक्तींच्या जेवणाची केली जात आहे?. मुंबई महानगरपालिकेने मार्चच्या शेवटच्या आठवडयात या सेवेची सुरुवात केली, तेव्हा सुमारे 14 हजार 500 गरजू व्यक्तींना अन्नपदार्थांची पाकिटे वितरित केली जात होती. आता ही संख्या वाढून दररोज तब्बल ’1 लाख 57 हज़ार व्यक्ती’ एवढी झाली आहे. तसेच हेल्पलाइनवर येणाया विनंतीनुसार या आकडयात वाढ केली जात आहे.

संपर्क साधा, मदत मिळवा!

स्थलांतरित कामगार व बेघर व्यक्तींच्या दोन वेळच्या जेवणासाठी या अन्नपदार्थांच्या पाकिटांचे मोफत वितरण 30 मार्च 2020 रोजी सुरु करण्यात आले.  या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या ’कोरोना कोविड 19’ ’हेल्पलाईन’वरदेखील  याविषयीच्या सूचना व विनंती नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत ङदूरध्वनी क्रमांक 1800-22-12-92ङ यावर संपर्क साधल्यानंतर व स्थलांतरित कामगारांबाबत आवश्यक ती माहिती दिल्यानंतर अन्न पाकिट वितरणासाठी संबंधितांचा तपशील लिहून घेण्यास व आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.