
कोरोनाचा संसर्ग ‘डायलिसिस’ यंत्राच्या माध्यमातून इतर व्यक्तींना होण्याचा धोका रोखण्यासाठी डायलिसिस करण्यासाठी येणाऱया सर्व व्यक्तींची प्राथमिक तपासणी बंधनकारक करण्याचे आदेश पालिकेने मुंबईतील सर्व डायलिसिस केंद्रांना दिले होते. मात्र, याचे उल्लंघन करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे उल्लंघन करणाऱया डायलिसिस केंद्रांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
मुंबईतील काही डायलीसिस केंद्रांमध्ये कोरोनाची लक्षणे असणाऱया रुग्णांचेही डायलीसिस करण्यात आल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तिंमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे किडनी विकार असलेल्या रुग्णांचे डायलिसिस केंद्रांमध्ये डायलीसिस करण्यापूर्वी त्यांची प्राथमिक कोरोना तपासणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱया डायलीसिस केंद्रांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.
पाच रुग्णालयांमध्ये डायलीसिसची स्वतंत्र व्यवस्था
मुंबईत 5 रुग्णालयांमध्ये करोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र डायलिसिस व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यात कस्तुरबा, केईएम, सेव्हन हिल्स, सैफी आणि नानावटी रुग्णालयाचा समावेश आहे. जे कोरोना बाधित रुग्ण वरील 5 रुग्णालयांव्यतिरिक्त ‘करोना’साठीच्या इतर रुग्णालयात दाखल आहेत, त्यांनादेखील डायलिसिसची आवश्यकता असल्यास केवळ डायलिसिस करण्यापुरते वरील 5 रुग्णांलयांमध्ये पाठविता येईल. अशा रुग्णांच्या बाबत डायलिसिस झाल्यानंतर पुन्हा आधीच्या रुग्णालयात करोना विषयक उपचारासाठी परत न्यावयाचे आहे.





























































