लॉकडाऊनमुळे बायको माहेरी अडकली; नवऱ्याने केले दुसरे लग्न!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत असताना देशात कोरोनाचे संक्रमण वाढू नये, यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे लग्न तुटल्याची घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. काही कारणाने बायको माहेरी गेली होती. त्यानंतर लॉकडाऊन घोषित झाल्याने तिला घरी परतता आले नाही. नवऱ्याने वारंवार बोलावले. मात्र, ट्रेन, बस आणि इतर वाहने बंद असल्याने येणे शक्य नसल्याचे तिने सांगितले. नवऱ्याला याचा राग आला. त्याने याच काळात प्रेयसीशी लग्न केले आहे. महिलेला याची माहिती मिळाल्यावर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बिहारच्या दुल्हनीबाजार येथे ही घटना घडली आहे. भरतपुरामधील धीरजकुमारचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. गेल्या महिन्यात काही कारणाने त्याची बायको माहेरी गेली होती. ती माहेरी गेल्यावरच लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे ती भरतपुरामध्ये परत येऊ शकली नाही. धीरजने पत्नीला घरी येण्यासाठी सांगितले. मात्र, लॉकडाऊन असल्याने घरी परतण्य़ासाठी कोणतीही वाहने नसल्याचे तिने सांगितले. तसेच लॉकडाऊन संपेपर्यंत परत येऊ शकत नसल्याचे तिने सांगितले.

बायकोच्या उत्तराने धीरजला राग आला. त्यामुळे शेजारच्या गावातील आपल्या प्रेयसीशी लग्न करण्याचे त्याने ठरवले. लॉकडाऊनच्या काळातच त्याने प्रेयसीशी लग्न केले. धीरजने दुसरे लग्न केल्याची माहिती त्याच्या बायकोला मिळताच तिने नवरा आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी धीरजविरोधात हुंडाबळी, बायकोचा छळ, फसवणूक आणि बायकोला अधारात ठेवत दुसरे लग्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धीरजला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.