
दरवर्षी ठाणे जिल्ह्याला जानेवारीपासून पाणीटंचाईचे भयानक चटके सोसावे लागतात. मात्र यावर्षी हे संकट ओढावणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. बारवी धरणात मुबलक पाणी साठा असल्याने सध्या लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या ठाणे जिल्हावासियांना शटडाऊनचा त्रास होणार नाही.
बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, एमआयडीसीतील कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन दरवर्षी जूनपर्यंत पाणी कपातीचे वेळापत्रक जलसंपदा आणि पाटबंधारे विभाग निश्चित करते. जूनच्या प्रारंभी पावसाने दमदार एण्ट्री केली तर पाणी कपात लगेच रद्द केली जाते. धरणातील घटणारा पाणी साठा पाहता जानेवारीपासून 20 टक्के पाणी कपात केली जाते. मेमध्ये तर ही कपात 40 टक्क्यांपर्यंत जाते. जानेवारी ते मे या काळात आठवड्यातून 24 ते 36 तास पूर्णपणे पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे सर्वांनाच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात. मात्र हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होईल, असा दिलासा दिला आहे. त्यातच बारवी धरणात सध्या 51.94 टक्के पाणी साठा आहे. हा साठा 31 जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज आहे. यातच वळीव पावसाचा आधार ही मिळेल. या सर्वांचा विचार करून ठाणे जिल्ह्यात पाणी कपात न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दहा वर्षांत पहिल्यांदाच पाणी कपातीचे संकट टळले आहे.
उंची वाढल्याने संकट टळले
बारवी धरणाची उंची 4 मीटरने वाढवल्याने धरणाची उंची 72.60 मीटर एवढी झाली आहे. उंची वाढल्याने पाणी कपातीचे संकट टळले आहे. यंदा उंची वाढल्याने धरणातील पाणी साठा 340.78 दलघन मीटर इतका झाला होता. धरणात मागील वर्षापेक्षा 106 दलघन मीटर इतका जादा पाणी साठा असल्याने पाणी कपातीची गरज नाही, असे अधिकारी सांगत आहेत. बारवी धरणात 51.40 टक्के इतका पाणी साठा असून जुलै अखेर हा साठा पुरेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता जयंत बोरसे यांनी दिली.





























































