
कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत गावात चोर घुसल्याच्या अफवेचा डहाणूत अक्षरशः कहर झाला. चोर समजून संतापलेल्या गावकऱयांनी दोन संन्यासी-महंतासह त्यांच्या चालकाची अक्षरशः दगडाने ठेचून हत्या केल्याची भयंकर घटना गुरुवारी रात्री उशिरा गडचिंचले गावात घडली. एकाची हत्या झाल्यानंतर दोघांना वाचवून पोलीस त्यांना व्हॅनमधून नेत असताना बेभान जमावाने तुफान हल्ला चढवून दोघांना व्हॅनमध्येच ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून जंगलात पळून गेलेल्या हल्लेखोरांचा कसून शोध सुरू आहे. या घटनेने अवघा पालघर जिल्हा हादरून गेला आहे.
महंत कल्पवृक्षगिरी, चिकणे महाराज त्यांच्या चालकासह कांदिवली येथून गुरुवारी रात्री साडेआठ-नऊच्या दरम्यान त्यांच्या इको कारने सुरतच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी डहाणूपासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिंचले या गावात आली. त्याआधी गावात चोर घुसल्याची अफवा पसरलेली होती. ते तिघे चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी त्यांची कार अडवली आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. तुमचे नाव काय, तुम्ही कुठे चालला, घराबाहेर का पडलात, असे एक नव्हे अनेक प्रश्न विचारले. पण त्यांच्या उत्तरांनी ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संशय आणखी वाढला.
कार पलटी, दगडांचा मारा
ग्रामस्थ व कारमधील तिघांची बाचाबाची झाली. त्यामुळे गावकऱयांनी आरडाओरडा सुरू करताच सातशे ते आठशेचा जमाव जमला. त्यांनी कारमधील तिघांना बाहेर खेचले आणि त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची कार पलटी करून टाकली, त्यांच्यावर दगडांचा मारा केला. या दगडफेकीत चालक जागीच ठार झाला. गडचिंचलेत तैनात असलेले पोलीस घटनास्थळी धावले आणि त्यांनी कल्पवृक्षगिरी व चिकणे महाराजांना वाचवत व्हॅनमध्ये बसवले. परंतु जमावाने लाठय़ा, काठय़ा आणि दगडांचा मारा करत व्हॅनची तोडफोड केली आणि व्हॅनमध्ये बसवलेल्या दोघांनाही जागीच दगडाने ठेचून मारले. ही घटना कळताच पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्यासह 400 पोलिसांचा ताफा दाखल झाला. मात्र तोपर्यंत जमाव पळून गेला होता. पोलिसांनी रात्रभर धरपकड करून 110 जणांना ताब्यात घेतले आहे. जंगलात पळून गेलेल्या गावकऱयांचा कसून शोध सुरू आहे.




























































