कोरोनामुळे चिनी अर्थव्यवस्थेला घरघर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नजरेलाही न दिसणाऱया कोरोना व्हायरसने चीनच्या पोलादी अर्थव्यवस्थेला अक्षरशः घरघर लावली आहे. 1976 नंतर प्रथमच चीनचा विकासदर 6.8 टक्क्यांनी घसरला असून घरगुती उत्पादनातही प्रचंड घट आली आहे. दिवसागणिक कोसळणारा हा डोलारा कसा सांभाळावा या विवंचनेत सध्या चीन आहे.

चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने आज चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. चीनची अर्थव्यवस्था ही अतिशय बलाढय़ असून जगात दुसऱया क्रमांकाची आहे. मात्र कोरोना व्हायरसने पोलादी व्यवस्थेतील या भक्कम अर्थव्यवस्थेला चूड लावण्याचे काम केले. जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीतच चीनचा विकासदर 6.8 टक्क्यांनी घसरला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तातडीने करण्यात आलेल्या उपायांमुळेही अर्थव्यवस्थेवर कमालीचा ताण पडला आहे. त्यामुळेच ही घसरण झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने म्हटले आहे.

मंदीच्या लाटेनंतर 2019 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेने बाळसे धरले होते. या वर्षात विकासदर 6.1 टक्के नोंदला गेला. अमेरिकेसोबत व्यापारी युद्ध सुरू असल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला अधूनमधून तडाखे बसत होते, परंतु त्याचा फारसा परिणाम विकासदरावर जाणवला नाही. डिसेंबरमध्ये कोरोना व्हायरस आला आणि चिनी अर्थव्यवस्थेने मानच टाकली. चीनची आयटी तसेच ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्सची बाजारपेठच कोरोनाने नेस्तनाबूत केली. चीनमधील अनेक कारखाने जवळपास तीन महिने बंद राहिले. शेअरबाजारला तर कोरोनाने मानच वर करू दिली नाही. परिणामी चीनच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली.

1976 नंतर प्रथमच विकासदर कोसळला
कोरोना व्हायरसमुळे चिनी अर्थव्यवस्थेला तडे गेले आहेत. कारखाने हळूहळू सुरू होत आहेत. छोटे उद्योग अजूनही सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आयटी क्षेत्रात अजूनही शुकशुकाट आहे. त्यातच घरगुती उत्पादनालाही फटका बसल्यामुळे ही परिस्थिती कधी सुधारणार हे सांगता येत नसल्याचे चिनी अर्थतज्ञांचे म्हणणे आहे.