
कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेत ग्राम स्तरावरील समस्या जाणून घेण्यासाठी जिप उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आढावा घेण्यात आला. सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी थेट संवाद साधत माहिती जाणून घेतली.
मालवण पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्स वेळी सदस्य सोनाली कोदे, अशोक बागवे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर व विविध विभागाचे प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी बहुतांश ग्रामपंचायत सरपंचांनी पराजिल्ह्यातून येणारे भाजी विक्रेते यांच्या आरोग्य तपासणी बाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत प्रश्न उपस्थित केले. तर काही गावात मुंबई तसेच अन्य शहरातून चाकरमानी, नातेवाईक मंडळी आली त्या सर्वांनी तपासणी करून घ्यावी. होम कोरनटाईन व्यक्तींनी घराबाहेर पडू नये यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अश्या काही सूचना सरपंचानी मांडल्या. ज्या ग्रामस्थांची घरे नादुरुस्त आहेत त्यांना घराच्या दुरुस्तीसाठी परवानगी मिळावी. याबाबतही काहींनी मागणी केली. एकूणच पंचयात समितीच्या आदेश सूचनांचे पालन करून तालुक्यातील सर्व 65 ग्रामपंचायत स्तरावर चांगले काम सुरू असल्याचे या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिसून आले. मात्र एकीकडे पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासन चांगले काम करत असताना काही गावातील तलाठी अपेक्षित काम करत नसल्याचा नाराजीचा सूर काही सरपंचांनी व्यक्त केला अशी माहिती सभापती पाताडे यांनी दिली.
































































