मुंबईत वेग मंदावला, पण धारावीचे टेन्शन कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरात कोरोनाचा वेग तुलनेने मंदावला असला तरी धारावीचे टेन्शन मात्र कायम आहे. आज दिवसभरात मुंबईत 87 नवे रुग्ण सापडले. त्यात धारावीतील 16 रुग्णांचा समावेश आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या आता 117 झाली आहे. दरम्यान, मुंबई किनाऱयावरील नौदलाच्या आयएनएस आंग्रे तळावरही कोरोनाने शिरकाव केला असून 27 जवानांना लागण झाली आहे.

मुंबईत गेल्या आठवडय़ात दोनशेपार गेलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार दिवसांपासून घटत आहे. 14 एप्रिल रोजी 204 झालेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 15 एप्रिल रोजी 183 वर आणि 16 एप्रिल रोजी 76 रुग्णांची घट होत थेट 107 वर आल्याने महामुंबईत आढळणाऱया रुग्णांची संख्या 42 टक्क्यांनी खाली आली. ही घट सलग तिसऱया दिवशी 17 एप्रिल रोजी कायम राहत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तब्बल 30 ने कमी आली. तर आज 18 एप्रिल रोजी हा आकडा काहीसा वाढत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 87 नोंदवली गेली. विशेष म्हणजे आजच्या अहवालात 12 ते 15 एप्रिल दरम्यान थायरोकेअर, मेट्रोपोलीस आणि सबरबन या प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या चाचण्यांचा समावेश आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालयात तपासणी झालेल्या 231 संशयितांमधून ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि पालिकेच्या माध्यमातून मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेणे, संपर्कात आलेल्या आणि संशयितांना क्वारेंटाईन करून देखरेख ठेवणे, उपचार करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अशा उपाययोजना केल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे.

एकाच दिवसात 42 जण कोरोनामुक्त
मुंबईत कोरोना नियंत्रणात असताना कोरोनामुक्त होणाया रुग्णांची संख्याही चांगलीच वाढत आहे. कोरोनाचा मुंबईत प्रवेश झाल्यानंतर आज सर्वाधिक 42 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आता एकूण कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 281 वर पोहोचला आहे.

पाचजणांचा मृत्यू
महामुंबईत गेल्या 24 तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 87 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 2509 वर गेला आहे. यातील 125 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी तीन जणांना दीर्घकालीन आजार होते तर एका व्यक्तीला वार्धक्य होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा 118 वर, दहा मृत्यू
धारावीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आज आणखी 16 नवीन रुग्ण सापडल्याने आता धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 118 वर पोहोचली असून यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण हे आधी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील (हाय रिस्क) व्यक्ती आहेत. यातील एक महिला दिल्लीत मरकजमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीची पुतणी आहे. धारावी हा दाटीवाटीने वसलेला झोपडपट्टीचा परिसर असल्याने येथील रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेकडून सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. धारावीत आज 16 नवे रुग्ण सापडले असून यात बालिकानगरमधील 14 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात 4 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. यात मरकजला गेलेल्या व्यक्तीच्या पुतणीचा समावेश आहे तर एक वॉर्डबॉय आहे. तसेच नाईकनगरमधील एका महिला आणि कामराजनगरमधील एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.

नौसैनिकांवर आयएनएस अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू
नौदलला साहाय्य करणाऱया संस्थेतील कर्मचाऱयाकडून तब्बल 27 नौसैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 7 एप्रिल रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. या कर्मचाऱयांना नौदलाच्या आयएनएस अश्विनी या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याशी संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱयांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेले 26 कर्मचारी एकाच निवासी इमारतीत राहत होते, तर 27 वा कर्मचारी हा आंग्रे शेजारीस नौदलाला मदत करणारया संस्थेतील होता.

नौदलाच्या पाणबुडया सुरक्षित
आयएनएस आंग्रे तळ लॉकडाऊन करण्यात आला आहे. या घटनेमुळे नौदलाच्या पाणबुडया आणि युद्धनौकांचे काय, असा सवाल निर्माण झाला आहे.