
पवई येथील जगविख्यात आयआयटी मुंबईने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सुसज्ज केले आहे. आता केवळ व्यक्तीच्या फोटोवरून त्याच्या तापाचे निदान होईल आणि आयसीयूंमध्ये संसर्ग टाळण्यासाठी रोबो सेवा देतील. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप कंपन्यांनी ही किमया केली आहे. या कंपन्या अद्ययावत उपकरणे आणि मोबाईल ऍप्स बनवून कोरोनाविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत.
थर्मल फोटो काढून तापाचे निदान
फाल्कन लॅब्ज या स्टार्टअप कंपनीने एक ऑटोमॅटिक क्रीनिंग उपकरण बनवले आहे. ते भिंतीवर किंवा ट्रायपॉडवर लावता येऊ शकते. टप्प्यात येणाऱया प्रत्येक व्यक्तीचे थर्मल फोटो हे उपकरण घेते आणि एखाद्या व्यक्तीला ताप आहे की नाही याचे तत्काळ निदान करून अलार्म देते. फाल्कन लॅब्ज ही उपकरणे लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेबरोबर काम करत आहे.
आयसीयूत रोबो राबणार
जान यू टेक्नॉलॉजिस या स्टार्टअप कंपनीने रॅक्स असलेली रोबोटिक स्मार्ट ट्रॉली बनवली आहे. ती विशेषतः रुग्णालयांसाठी वापरता येऊ शकते. ही ट्रॉली वायफायने कनेक्ट करून रिमोटद्वारे चालवता येते. आयसोलेशन वॉर्डांमध्ये जेवण, औषधे आणि अन्य आवश्यक साहित्य पोहोचवता येतात. रुग्णांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या ट्रॉलीमध्ये इनबिल्ट कॅमेराही आहे. हैदराबाद, लखनौ आणि दिल्लीतील रुग्णालयांना अशा रोबोटिक ट्रॉली देण्यात आल्याची माहिती कंपनीचे संस्थापक साई हेमंथ यांनी दिली.






















































