शिर्डीसह राहाता तालुका कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिर्डीसह राहाता तालुका कोरोनामुक्त झाला असून राहाता तालुक्यात आढळलेल्या एकमेव रूग्णाचे 14 दिवसानंतर घेतलेले दोन्ही अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे. राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राहाता तालुका कोरोनामुक्त झाला असला तरीही लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरिकांनी पुर्वीप्रमाणेच लॉकडाऊनचे पालन करावे, असेही तहसिलदारांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेली इंडोनेशियातील एक व्यक्ती कोल्हार, भगवतीपूर, लोणी खुर्द, लोणी बुद्रूक, हसनापूर, दाढ बुद्रूक, पाथरे आणि हनमंतगाव या सात गावातील 25 व्यक्तींच्या संपर्कात आली होती. त्या सर्वांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता त्यातील लोणी खुर्दमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीवर 4 एप्रिलपासून नगर येथील शासकिय रूग्णालयात उपचार सुरू होते. चौदा दिवसानंतर त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 55 व्यक्तींनाही शिर्डी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या सर्वांमध्ये 14 दिवसात कोणतीही लक्षणे आढळली नाही. त्या सर्वांची राहाता ग्रामीण रूग्णालयात तपासणी करून त्यांनाही घरी सोडण्यात आल्याची माहीती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.