
देशभरात लॉकडाऊन असल्याने 28 मार्चपासून सेलू येथील शिबीरात अडकलेल्या नागरिकांपैकी 41 जणांना शुक्रवारी त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे. विविध जिल्ह्यातून आलेले हे मजूर असून ते सेलूमध्ये अडकले होते. या 41 जणांना त्यांच्या गावापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिन्याभरानंतर गावाकडे जाण्याची परवानगी मिळाल्याने त्यांना आनंद झाला आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सेलूच्या सीमा उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आल्या आहेत. इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांची वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय हरबडे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय तपासणी करण्यात येते. तसेच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नूतन महाविद्यालयाच्या श्रीरामजी भांगडीया वसतिगृहात करण्यात येते. तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी पुढाकार घेउन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे या नागरिकांना गावी जाण्याची परवानगी मागितली. परिस्थितीचा आढाव घेत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि त्यांच्या गावापर्यंत जाण्याची व्यवस्थाही केली आहे. सातारा, यवतमाळ, जालना, नाशिक, हिंगोली या जिल्ह्यातील हे मजूर 28 मार्चपासून सेलूतील कॅम्पमध्ये रहात होते. त्यांना शुक्रवारी सेलूतून निरोप देण्यात आला. आता सेलूतील कॅम्पमध्ये मध्यप्रदेश, राजस्थानसह इतर काही भागातील जवळपास 23 जण आहेत. त्यांची योग्य ती व्यवस्था ठेवण्यात आली आहे.































































