
अकोला जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे 12 अहवाल प्राप्त झाले. त्यातील एक रुग्ण पॉझिटीव्ह असून उरलेले सर्व 11 निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत एकाने वाढ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा अकोला शहरातील सिंधी कॅम्प भागातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान रुग्ण ज्या भागातील आहे तो सिंधी कॅम्प व पक्की खोली परिसर प्रतिबंधित केल्याचे, आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या 17 झाली आहे. तर दोन कोरोना रुग्णंचा मृत्यू झाला आहे. आज एकाच्या पॉझिटीव्ह अहवालाची भर पडल्यामुळे आता आजअखेर आठ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
सिंधी कॅम्प परिसर प्रतिबंधित
आज पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा सिंधी कॅम्प भागातील पक्की खोली परिसरातील रहिवासी असल्याने आता सिंधी कॅम्प व पक्की खोली परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज जारी केले आहेत. आता या भागातील रहिवासी बाहेरील भागात व बाहेरील व्यक्ती या भागात जाऊ अथवा येऊ शकणार नाहीत. या भागातील प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच या व्यक्तीच्या संपर्कांचाही तपास करण्याचे काम सुरु झाले आहे.


























































