नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 6 जणांना कोरोना, पंजाब सरकार सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर नांदेडमध्ये अडकून पडलेल्या पंजाबमधील यात्रेकरूंना वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सद्वारे सोडण्यात आले होते. त्यापैकी तीन दिवसापूर्वी पंजाबमध्ये गेलेल्या तरणतारण जिल्ह्यातील सहा यात्रेकरूंना कोरोनाची लागण झाल्याचे काल रात्री उघड झाल्यानंतर पंजाब प्रशासनाने याबाबत खबरदारी घेतली आहे. उद्या पंजाबात पोहोचणाऱ्या सर्व यात्रेकरूंची कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

तीनच दिवसांपूर्वी नांदेड येथे अडकलेले पंजाब येथील यात्रेकरू येथून पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आले. काल ते सकाळी तरणतारण जिल्ह्यात पोहोचल्यानंतर त्यांची swab ची चाचणी करण्याचे ठरले. या चाचणीचे अहवाल काल सायंकाळी आले त्यानुसार नांदेड येथून परतलेल्या यात्रेकरूपैकी सहा जणांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत पंजाबकडे रवाना झालेल्या अडीच हजार यात्रेकरूंचा प्रवास सुरू झाला असून पंजाब सरकारने राज्याच्या सीमेवरच किंवा ते पोहोचतील त्या गावाला वैद्यकीय पथक पाठवले आहे. या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या संदर्भात ही चाचणी होणार असून याबद्दल पंजाब सरकारने सर्वांना सतर्क केले आहे. पंजाब पोलीस सर्व उपविभागीय अधिकारी तसेच आरोग्यव्यवस्था या सर्वांची टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल डिस्टन्स आणि आणि कुठल्याही उपाययोजना याठिकाणी करण्यात आल्या नव्हत्या. तसेच पंजाब मधून प्रवास करून आलेल्या एका चालकाला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने महापालिका आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यायला हवी होती, मात्र ती घेतली गेली नाही. नांदेडमधून तरणतारण जिल्ह्यात गेलेल्या सहा जणांना कोरुन विषाणू संसर्गाची झालेली लागण ही बाब गंभीर मानली जाते दरम्यान जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान पिरबुऱ्हाण नगरातील त्या 64 वर्षीय रुग्णाची चाचणी परत करण्यात आली त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.